कोल्हापूर /प्रतिनिधी
पतंग उडविताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. तेंव्हा पतंगप्रेमींनी पतंग उडविताना विद्युत यंत्रणेपासून सावधानता बाळगावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
तीळ-गुळाच्या गोडव्यासह आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्राती सणाचा आनंद व्दीगुणित करतात. बालकांसह जेष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. शहरी व ग्रामीण भागात विद्युत वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. पतंगप्रेमीनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावा. विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. त्यामुळे विद्युत वाहिन्यांचे एकमेंकावर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते. घराच्या गच्चीवरून, रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. विद्युत वाहिन्यांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे. धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा. कारण धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात विद्युत प्रवाहीत होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.
आप्तकालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या नजिकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा जेणेकरून तात्काळ वीजपुरवठा खंडीत करून तातडीची मदत करणे सोईचे होईल. अथवा महावितरणच्या 24 तास कार्यरत असलेल्या ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 किंवा 1800-233-3435 किंवा 1800-102-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.