कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात प्रथमच आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय थॅलेसेमिया निर्मुलन परिषद उत्साहात संपन्न झाली.थॅलेसेमिया निर्मुलन असोसिएशन, कोल्हापूर व रक्तदाता कोल्हापूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात थॅलेसेमिया व रक्तदानाविषयी कार्य करणारे 50 को-अॉर्डिनेटर्स या परिषदेसाठी कोल्हापूरात आले होते. यावेळी रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, गरिब व गरजू रूग्णांसाठी रक्तदान करणाऱ्या 150 रक्तदात्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. त्यानंतर रक्तदान आणि प्लेटलेटस् याविषयी भारत सरकारचे SDP चे ब्रँन्ड ॲम्बेसिडर विश्वजीत काशीद यांनी रक्तदाते व को-अॉर्डिनेटर्सना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डि. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक सौ. वैशाली गायकवाड, उप कुल सचिव श्री. अजित पाटील, गोकूळ शिरगाव पोलीस स्टेशनचे A.P.I श्री. सुशांत चव्हाण, आशावर्कर संघटना प्रमुख सौ. नेत्रदिपा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि. 12 रोजी थॅलेसेमिया रूग्णांसाठी अत्यावश्यक असणारी फेरिटीन तपासणी मोफत आयोजित करण्यात आली होती. ही तपासणी करून घेण्यासाठी कोल्हापूर, कराड, सातारा, सांगली, सिंधुदूर्ग अशा अनेक ठिकाणाहून 25 पेक्षा जास्त थॅलेसेमिया रूग्णांना घेऊन त्यांचे पालक आले होते. हिमेटोलॉजिस्ट डॉ. वरूण बाफना, डॉ. प्रिती नाईक, डॉ. अभिजीत गणपुले यांनी थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. मल्लिनाथ कलशेट्टी व सीपीआर अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. लवकरच सीपीआर मध्ये थॅलेसेमिया रूग्णांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये चांगली सुधारणा करून केअर सेंटर सुरू करण्यात येईल असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी दिले, तर महानगरपालिकेच्या वतीने यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र थॅलेसेमिया निर्मुलन समिती मुंबईचे सचिव श्री. राजकुमार राठोड, उपसचिव श्री. जयराम नाईक, श्री. महेंन्द्र मेंडन, श्री. जितेंन्द्र तांडेल, श्री. विनोद हरिया (सु-मती ग्रूप), कु. संगिता वाधवा, रोहित गुट्टे यांच्यासह थॅलेसेमिया निर्मुलन असोसिएशन कोल्हापूरचे संस्थापक श्री. रोहित कदम, अध्यक्ष श्री. धनंजय नामजोशी, उपाध्यक्ष श्री. रणजीत जाधव, सचिव श्री. अमोल निल्ले, खजानिस सौ. रिना तुरे, अनिल व्हटकर, राजाराम पात्रे, अभिजीत बुधले, अनिकेत जाधव, ऋतुराज कदम, जोतिराम कुंभार, राहुल गोंदिल, ऐश्वर्या मुनिश्वर, सौरभ कापडी आणि रक्तदाता कोल्हापूरचे सर्व सदस्य उपस्थित होते.